शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी प्रलंबित: महाडीबीटी पोर्टलवरील ५६४१ अर्जांची तपासणी रखडली.
पुणे: महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळले जातात. तथापि, शिक्षण विभागाच्या वारंवार सूचनांनंतरही पुणे विभागातील महाविद्यालये, विद्यापीठे, आणि संस्थांनी ५,६४१ अर्जांची पडताळणी अद्याप पूर्ण केलेली नाही.
पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांचे कुलसचिव, तसेच पुणे उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रलंबित अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज पडताळणी रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.