December 22, 2024
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

भारतीय सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात

पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार

नागरिकांनी घाबरुन जावू नये, प्रशासनास सहकार्य करावे-अजित पवार

महाराष्ट्र २४ तास, पुणे, दि. २५: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील परिस्थिती बघता आवश्यक त्या उपाययोजना करुन नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज, भारतीय सैन्यदलाचे अमितेश पांण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे शहरातील एकतानगर सिहंगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पुल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरात भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएचे पथक तैनात करण्यात आले असून बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांना करण्यात येणाऱ्या मदत व बचाव कार्यास अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता शक्यतो धरणातून दिवसा पाण्याचा विसर्ग वाढवावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून टंचाई भागातील तलाव भरून घ्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

पवार म्हणाले, पुरबाधित परिसरातील नागरिकांना मदतकार्य सुरू असून ज्या गृहनिर्माण संस्थांच्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले आहे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून पूर नियंत्रणाचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुरामुळे अन्नधान्य खराब झाले असलेल्या बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना पूरस्थितीतमुळे दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. स्थलांतंरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या काळात दुर्घटनेत जखमी व्यक्तींचा उपचाराचा खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. पूर परिस्थती आटोक्यात आण्याकरीता जिल्हा प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी व्हावे. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे.

लवासा येथे दरड कोसळलेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरुन जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे आणि शहरातील परिस्थितीबाबत मनपा आयुक्त डॉ. भोसले यांनी माहिती दिली.

Related Posts