महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा वापरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या वामन म्हेत्रें वर कायदेशीर कारवाई करा..
महिला पत्रकार सरकार साठी लाडक्या बहिणी नाहीत का?
महाराष्ट्र २४ तास, पिंपरी-चिंचवड, दि. 21: बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अपमानास्पद वर्तन आणि अश्लील भाषेचा अनुभव आला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी वापरलेल्या अर्वाच्य भाषेमुळे महिला पत्रकारांसमोर निर्माण झालेल्या अपमानास्पद परिस्थितीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली.
महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्यावर झालेल्या अपमानास्पद वर्तनावर पत्रकारांच्या तक्रारी.
बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जन आक्रोश निर्माण झाला होता. या वेळी वृत्तांकन करत असलेल्या पत्रकार मोहिनी जाधव यांच्यावर वामन म्हेत्रे यांनी असभ्य वर्तन केले आणि अपमानास्पद भाषा वापरली. पिंपरी चिंचवडमधील पत्रकारांनी म्हेत्रेंच्या या कृत्यावर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार आणि पवना समाचारचे संपादक अरुण कांबळे यांनी विधान केले की, “शासन लाडकी बहीण योजना राबवित असताना राज्यातील महिलांवर असे अत्याचार होत असल्याने ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. मोहिनी जाधव यांच्यावर झालेल्या अपमानास्पद वर्तनावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.”
पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांनी सरकारकडे मागणी केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी म्हटलं की, “बदलापूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि महिला पत्रकारांवर झालेल्या अपमानास्पद वर्तनाबाबत सरकारने ठोस कारवाई करावी.”
पुढारी न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर यांनी सांगितले की, “वामन म्हेत्रे यांनी मोहिनी जाधव यांच्याशी केलेले वर्तन हे अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारच्या वर्तनावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी असा इशारा दिला की, भविष्यात असे प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, टीव्ही 9 चे प्रतिनिधी रणजित जाधव, साम मराठीचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे, मुंबई तकचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, एनडी टीव्हीचे प्रतिनिधी सूरज कसबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन शिंदे, मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष पराग कुंकूलोळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, लीना माने, विशाल जाधव, राम बनसोडे, दिलीप देहाडे, संजय धुतडमल, देवा भालके, गणेश शिंदे, औदुंबर पाडळे, आणि म्हासाळ या सर्व पत्रकारांनी सहभाग नोंदवला.