पैशाअभावी जीव गेला! “‘ट्रस्ट’च्या नावाखाली अन्याय! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला नाकारले उपचार”

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदयद्रावक घटना : आमदार सहाय्यकाची पत्नी उपचाराविना दगावली.
ट्रस्ट रुग्णालय असूनही उपचार नाकारले?
“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात संतापाचा स्फोट! चिल्लर फेकून नागरिकांचा रोष”
पुणे : शहरातील एक नामवंत ट्रस्टद्वारे चालवलेले रुग्णालय – दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली ऊर्फ तनिषा सुशांत भिसे (वय ३०) यांना प्रसूतीसाठी दाखल होण्यास नकार देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणींचा हवाला देत रुग्णालय प्रशासनाने उपचार नाकारल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे अखेर मोनाली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण पुणे शहराला या घटनेने हादरवून सोडले आहे.
ट्रस्ट रुग्णालय असूनही उपचार नाकारले?
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे गरीब आणि गरजूंना आरोग्यसेवा पुरवणारे ट्रस्टद्वारे चालवलेले रुग्णालय आहे. मात्र, मोनाली भिसे यांच्या प्रकरणात मानवतेला काळीमा फासणारी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचा आरोप होत आहे. मोनाली यांना प्रसूतीसाठी तातडीने दाखल करण्याची आवश्यकता होती. परंतु, उपचारासाठी अॅडव्हान्स रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला, अशी माहिती सुशांत भिसे यांनी माध्यमांना दिली.
वेलणेश्वर ते पुणे : मदतीचा संघर्ष अपूर्णच
सुशांत भिसे हे मूळ वेलणेश्वर (रत्नागिरी) येथील रहिवासी असून, सध्या पुण्यात राजकीय कार्यात सक्रिय आहेत. पत्नी मोनाली यांना त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गाठले. पण आर्थिक स्थितीमुळे उपचारात अडथळा आल्याचे सांगण्यात आले. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मोनाली यांची प्रकृती खालावली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर भिसे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, ‘ट्रस्ट रुग्णालयात जर आर्थिक अडचणींमुळे मृत्यू होत असेल, तर अशा संस्थांचा हेतू काय?’ असा सवाल विचारला जात आहे.
राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट
या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांनी स्वतः या घटनेबाबत शोक व्यक्त करत न्याय मिळवण्यासाठी भिसे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. विविध सामाजिक संघटना आणि आरोग्य हक्कांसाठी कार्य करणाऱ्या संस्था देखील रुग्णालयाविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ट्रस्टद्वारे चालवलेली रुग्णालये जर गरजू रुग्णांना उपचार नाकारत असतील, तर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्य ही मूलभूत गरज असून, ती कोणत्याही परिस्थितीत नाकारली जाऊ शकत नाही, हे लक्षात घेता अशा घटनांवर त्वरित चौकशी होणे गरजेचे आहे.
चिल्लर फेकून नागरिकांचा रोष”
आज सकाळी, मोनाली ऊर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निदर्शन केलं. रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत असताना काही आक्रमक नागरिकांनी चिल्लर फेकून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार थोड्याच वेळात सुरक्षारक्षकांनी नियंत्रणात आणला, मात्र नागरिकांचा संताप उफाळून आला होता. “ट्रस्ट रुग्णालय जर पैशांअभावी आईचा जीव घेत असेल, तर असा ट्रस्ट नको,” अशा संतप्त प्रतिक्रिया देत अनेकांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.